Tuesday, January 17, 2017

बंधनमुक्ती


आता कुठे सापडला होता
बंधनमुक्तीचा रस्ता
आणि लगेच खाल्ल्या
रस्त्यात खस्ता.


वखवखणाऱ्या मनावर
तोऱ्याचा ताबा
नुकत्याच रूळलेल्या रस्त्यावर
लगेच आला थांबा.


तरी मला वाटलं होतं
रस्ता असावा उजेडातला
नाहीतर चोर रस्त्याने
व्हायचं धडपडायला.


लागली ठेच तर लागू दे
पडू दे वा धडपडू दे
यापरीस हिम्मत मिळणार कशी
आता हा वारू चौखूर उधळू दे.

- चेतन कदम.
१६  जानेवारी  २०१७

Tuesday, October 26, 2010

डोह


त्या दिवसापासुन पुन्हा पुन्हा
एक चेहरा खुणावतोय
डोळे मिटले कि पापण्यात लपतोय
डोळे उघडले कि नजरेसमोर तरळतोय

सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लुकलुकणारया पापण्या
जणु गुलाबाच्या पाकळ्याच
आणी ते मुखकमल नितळ भाव असणारे

मी मुग्ध आहे धुंद आहे
या साचलेल्या डोहाला आज
वाट मिळाली आहे
वाहायला खळखळायला
आता मी वाहणारच
सखे,
हा डोह आता कधीच नाही आटणार,
शेवाळणार, हिरवटणार...

- चेतन कदम.
२१ ऑक्टोबर २०१०

Friday, June 26, 2009

अबोली


तो भ्रमर वेडा एकला
सतत उडत राहणारा,
उडण्यातच आनंद मानणारा,
आपल्यातच गुंतुन राहणारा,

एक दिवस भेटली ती त्याला,
इतर फुलांहुन मंद गंध असलेली,
मकरंद नसलेली,
परि वेगळेच सौंदर्य ठासुन भरलेली,

कोवळी, सालस अन् निरागस,
नेहमीच प्रसन्न टवटवीत हसणारी,
वेडीपिशी होवुन मस्तीत डुलणारी,
अल्लडपणा जपत नाजूक खुलणारी.

भारीला भ्रमर वेडा
तिच्या प्रसन्नतेने,
निरागस आकर्षकतेने,
मनमोहक केशरी रंगाने,

परि गेला उडुनी तो कळता
तिजपाशी मकरंद नसल्याचे
ती करित राहिली प्रसन्न वर्षाव प्रेमाचे,
तिने न सोडिले रानमाळी फुलायचे

-चेतन कदम
२५ जुन २००९